श्रमदानातून झाली पाण्याची वाट मोकळी

31 Jan 2025 14:35:36
 

उंडवडीता. बारामती : सगळेजण एकत्र आल्यास कोणतेही काम अवघड नसते याचा प्रत्यय नुकताच उंडवडी सुपे परिसरातील शेतकऱ्यांना आला.

शिरसाई उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन मागील पंधरवड्यापासून बारामती जिरायती भागातील शिरसाईच्या लाभार्थी गावात सुरू आहे. चार दिवसांपूर्वीच खराडेवाडी हद्दीत या योजनेवरील मुख्य उजव्या कालव्यात खोलगट जागी दगड-गोट्यांचा ढिगारा कोसळून कालव्यातील पाण्याला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे कारखेलखराडेवाडी, सोनवडी सुपे, जळगाव सुपे, अंजनगाव आदी गावांना पाणी पोचण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता.   

कालव्याचा भाग त्याठिकाणी खोलगट व अरुंद असल्यामुळे जेसीबी मशिन किंवा ट्रॅक्टरचा वापर करणे शक्य नव्हते. अशावेळी मनुष्यबळाने काम करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. ऐनवेळी मजूर उपलब्ध होणे कठीण होते. ही बाब शिरसाई योजनेचे कनिष्ठ अभियंता अमोल शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर आठ ते दहा शेतकऱ्यांनी एकत्रित येत कालव्यातील पाण्यात उतरून दगड-गोटे तासाभरात बाजूला केले. अडथळा दूर झाल्यामुळे पुढील गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली.


अॅग्रोवन, ३०.१.२५

Powered By Sangraha 9.0