नगदी पिकाला दिली फळबागेची जोड

07 Jan 2025 10:14:19
 
 सध्या शेतीत मजूरटंचाई ही सर्वात मोठी समस्या होऊन बसली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी यांत्रिकीकरण तसेच उपलब्ध यंत्रांमध्ये सुधारणा करून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सातारा जिल्ह्यातील जयपूर  (ता. कोरेगाव) येथील किशोर व दत्तात्रेय हे कुलकर्णी हे त्यापैकीच एक आहेत.
शेतीतच पूर्ण लक्ष घातल्यानंतर किशोर यांनी सुधारित तंत्राच्या वापरावर भर दिला. वांगी, टोमॅटो, मिरची आदी पिकांची निवड केली. दोघे बंधू, त्यांच्या पत्नी, आई (विद्या) व वडील असे सर्वजण शेतीत राबू लागले. त्यातून शेतीच्या विकासाला चालना मिळाली. क्षेत्र कमी असल्याने खंडाने शेती करण्यास सुरुवात केली. सध्या घरची व खंडाने अशी मिळून १५ एकर शेती कुलकर्णी करीत आहेत. त्यांच्याकडे  चार म्हशी व एक देशी गायदेखील आहे.
ऊस, आले, पपई, कलिंगड ही कुलकर्णी यांची प्रमुख पिके आहेत. यामध्ये प्रत्येकी चार एकरांवर ऊस व आले, त्यात पपई व अन्य शेती ते चक्राकार पद्धतीने घेतात. त्यांची शेतजमीन मुरमाड आहे. प्रतिवर्षी चार ते पाच एकरांत आडसाली ऊस असतो.  शक्यतो खोडवा घेतला जात नाही. त्यामुळे पिकांच्या 'रोटेशन'साठी जमीन उपलब्ध होत असते. एकरी सरासरी ८० ते ९० टन ऊस उत्पादन मिळते. दरवर्षी आले पिकात आंतरपीक म्हणून पपई  घेण्यात येते. जूनमध्ये आले लागवड केल्यावर साधारण तीन महिन्यांनी म्हणजेच सप्टेंबर महिन्यात पपईची लागवड होते.
कुलकर्णी बंधू अधिकाधिक क्षेत्रावर शेती करू लागले तसतशी मजूर समस्या जास्त जाणवू लागली. त्यानंतर ट्रॅक्टर, पल्टी नांगर, फणपाळी, रोटर, रेजर, तसेच ऊस व आले या पिकांसाठी स्वतंत्र दोन पॉवर टिलर्स, फळबागा फवारणीसाठी ब्लोअर व पेरणीसाठी छोटा ट्रॅक्टर असे यांत्रिकीकरण केले. तसेच शंभर टक्के ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. पपई विक्रीसाठी बागेबाहेर काढण्यासाठी छोटा ट्रॅक्टर घेतला असून सोबत साडेचार फूट रुंदी व १० फूट लांबी असलेली ट्रॉली देखील बनवून घेतली आहे. ट्रॅक्टर बागेत सहज फिरण्यासाठी फळबागांमध्ये योग्य अंतर ठेवले जाते. हंगामी पिकांची पेरणी करण्यासाठी बीबीएफ यंत्राचा वापर केला जातो.
अॅग्रोवन ३.१०.२४ (किशोर कुलकर्णी : ८२७५३७०२४४)

Powered By Sangraha 9.0