२८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत कर्नाटकात सेडम इथे सातवा भारतीय संस्कृती उत्सव साजरा झाला. त्यात एक दिवस स्वयं उद्योग संमेलन आयोजित करण्यात आले होते. तिथे कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यातील लघुउद्योजक आपल्या अभिनव उत्पादनांसह सहभागी झाले होते. ‘अपना हाथ जगन्नाथ’ या संकल्पनेवर आधारित हस्तव्यवसाय हे याचे वैशिष्ट्य.
दावणगिरीचे शिवराज आणि गणेशबाबू पाकिटात नारळाच्या पाण्याची पावडर तयार करून विकतात. ते म्हणाले, “आपण प्रवासात नारळपाणी घेऊन जाऊ शकत नाही. अनेक हॉस्पिटलमध्ये नारळ नेऊ देत नाहीत. अशावेळी ही पावडर उपयोगी पडते. हे पाण्यात घालून प्यायले की नारळ पाण्याचा स्वाद येतो.”
शहापूरचे राजकुमार अतिशय गरीब परिवारातले. पंतप्रधान मोदींच्या भाषणातून ‘श्रीअन्न’ हा शब्द ऐकून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी रागी धान्यापासून पापड तयार करायला सुरुवात केली. आज त्यांचा उद्योग भरभराटीस येतो आहे.
आंध्र प्रदेशातील तेलंगणा येथील वेणुगोपाल हे सीताफळाची कुल्फी तयार करतात. सीताफळाचा मोसम थंडीच्या दिवसात असतो. ते त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर काढून ‘डीपफ्रीझर’ मध्ये साठवून ठेवतात. गरजेनुसार कुल्फी तयार करून ते विकतात. बारा लाख रुपयांचे भांडवल घेऊन सुरु केलेला हा व्यवसाय आता संपूर्ण कुटुंबाचे कमाईचे साधन झाला आहे.
हैदराबाद येथील के.बी.टी.सुंदरी यांचे वय ७४ , पण उत्साह तरुणांना लाजवणारा. त्या ताडपत्रीपासून बॉक्सेस, चटई, सजावटी सामान तयार करून विकतात इतकेच नाही तर त्याचे प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळा घेतात.
शिल्पकार एरन्ना यांचा स्टॉल तर आकर्षणाचे केंद्र होता. ते लाकूड, फायबर किंवा धातूपासून ते देवघर तयार करतात. आपल्या परंपरागत व्यवसायाला आधुनिक रूप देणारे एरन्ना म्हणतात, “माझं काम हीच माझी ओळख, हीच माझी पूजा आणि हाच माझा देव!”
पांचजन्य १६.२.२५