महाकुंभनगरी : बारा ज्योतिर्लिंग मंदिरांच्या संकल्पनेवर आधारित भव्य प्रवेशद्वार, चारधाम मंदिरांच्या प्रतिकृतींनी सजलेला १०४ फुटी कलादर्शन मंच आणि भारतीय कला-संस्कृतीचा सुरेख मिलाफ घडविणारी पटचित्रे... सारे काही डोळ्यांत साठवून ठेवावे असे हे दृश्य आहे 'कलाग्राम'चे. महाकुंभमेळ्यानिमित्त तब्बल दहा एकरांवर वसलेल्या कलाग्राममध्ये भारतीय कला, संस्कृती, परंपरांचा अद्भुत संगम दिसतो.
महाकुंभनगरीत नाग वासुकी भागात केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने वसवलेले हे कलाग्राम भाविक, पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. भव्य महाकुंभनगरीत कलाग्रामचे महाप्रवेशद्वार चटकन लक्ष वेधून घेते. ज्योतिर्लिंग मंदिरे चितारलेले हे महाप्रवेशद्वार ६३५ फूट रुंद आणि ५४ फूट उंच आहे. यात विविध राज्यांच्या धार्मिक-सांस्कृतिक प्रतीकांना मानाचे स्थान देण्यात आले आहे. तिथे पश्चिम बंगालच्या पटचित्रांपासून ते आसामच्या बांबू हस्तकलेपर्यंत देशभरातील कला-कौशल्याचे दर्शन घडते.
देशाचा इतिहास, महाकुंभाचा वारसा आदींबाबत 'शाश्वत कुंभ' हा विभाग जिज्ञासेला चालना देतो. 'अनुभूत मंडप' मधील गंगा अवतरणावर आधारित लघुपट रोमांचकारी अनुभव देतो. देशाच्या कला, संस्कृती, खाद्यवैविध्याचे प्रतिबिंब असलेले कलाग्राम एकतेचे दर्शन घडवते. देशभरातील विविध खाद्यपदार्थांचा आस्वादही इथे घेता येतो. वेगवेगळ्या राज्यांचे वैशिष्टपूर्ण पदार्थ इथे मिळतात. शिवाय हस्तकलेसह देशभरातील कलाकुसरींच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीही इथे होते.
नृत्यापासून अभिजात संगीतापर्यंत देशाच्या कलासंस्कृतीचे आविष्कार एका भव्य मंचावर पाहण्याची संधी कलाग्रामध्ये मिळते. आत्तापर्यंत देशातील सुमारे १५ हजार कलाकारांनी या मंचावर सादरीकरण केले आहे.
महाराष्ट्र टाईम्स २१.२.२५