पंतप्रधानांनी त्यांना ..... २४ मिनिटात जागा दाखवली !

25 Feb 2025 14:35:43
 

                 दिल्लीत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटनासाठी  पंतप्रधान मोदीजी उपस्थित होते. ‘शरद पवार ह्यांनी हे भाग्य माझ्या वाटेला दिले ‘हे सांगताना आणि त्याच्या बरोबर वावरताना जी देहबोली मोदीजी ह्यांची होती ती एका संस्कारीत राजकारण्याची होती.

                  ह्या सगळ्या मंडळीनी पुरोगामित्वाचा नावाखाली साहित्य , संस्कृती आणि कला क्षेत्रात जो धुमाकूळ घातला आहे त्या सर्वांना महाराष्ट्र नेमका कुणामुळे ओळखला जातो ? मराठी भाषेचे वैभव कसे आहे? हे सांगताना ज्या महापुरुषांची नावे मोदीजी ह्यांनी घेतली त्याच महापुरुषांना ह्या विशिष्ट प्रकारच्या ecosystem ने हद्दपार करण्याचा गेली  ४० वर्षे जणू चंगच बांधला होता.

                  ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्याबरोबर समर्थ रामदास यांचे नाव घेताना  त्यांनी कुठलाही न्यूनभाव मनात ठेवला नाही.

                  संपूर्ण देशाला स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणारे टिळक , सावरकर , वासुदेव बळवंत फडके , चाफेकर हे सगळे मराठी भाषिक होते हे सांगताना रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले हेच अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले .

                  शिवाजी महाराज ह्यांच्या राज्याभिषेक वर्षाला ३५० वर्षे , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्यांच्या जन्म वर्षाला ३०० वर्षे हा उल्लेख तर त्यांनीं केलाच पण त्यानंतर संघाबद्दल त्यांनी काढलेले उदगार सर्व स्वयंसेवक , कार्यकर्ते ह्यांना सुखावणारे आणि अभिमान बाळगावा असे ठरले.

                      १०० वर्षापूर्वी महाराष्ट्रात एका डॉ .केशव बळीराम हेडगेवार ह्या महापुरुषाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या संघटनेचे बीज रोवले आणि आता तो एक वटवृक्ष बनला आहे हे त्यांनी सांगितले. ‘वेदांपासून  ते विवेकानंद ह्यांच्या विचारधारेला स्थापित करण्यासाठी निर्माण झालेले कार्य’ असा संघकार्याचे वर्णन करताना त्याचा उल्लेख ‘संस्कार यज्ञ’ ह्या शब्दात त्यांनी केलाच आणि ‘माझ्यासारख्या लाखो लोकांना देशासाठी समर्पित होण्याची प्रेरणा संघाने निर्माण केली आहे’ हे पण विशेष करून सांगितले.. ‘माझी मराठीची ओळख दृढ होण्यास संघ कारणीभूत आहे’ हे ही‌ त्यांनी सांगितले.

                मोदीजी ह्यांच्या एक बाल स्वयंसेवक ते प्रचारक , कार्यकर्ता ह्या संपूर्ण प्रवासात त्यांच्या जीवनाला आकार देणारे योगायोगाने बरेच मराठी भाषिक प्रचारक होते. मधुकरराव भागवत  (पूजनीय मोहनजी ह्यांचे पिताश्री ), लक्ष्मणराव इनामदार तथा वकील साहेब  अशी  किती तरी नावे सांगता येतील. त्यांच्या ह्या एका वाक्यात अशा अनेक अनामिक कार्यकर्त्यांच्या प्रति कृतज्ञता भाव होता.

                  संघाला पाण्यात पाहणाऱ्या संघद्वेष्टयाना, सावरकरांना सतत शिव्या देणाऱ्या कृतघ्न मंडळींना , सिनेमा , साहित्य , नाटक ह्यातून सतत विद्रोही अजेंडा पसरवणाऱ्या पिलावळीला आणि सगळ्यांना  केवळ २४ मिनिटांत जागा दाखवणारे मोदीजी ह्यांचे भाषण कार्यक्रमाच्या मूळ उद्देशापासून कुठेही भरकटले नव्हते आणि त्याला कुठलाही राजकीय रंगही  नव्हता.

 

 

 

 

Powered By Sangraha 9.0