देशात बांधणार पहिले बॅटरीवरील मालवाहू जहाज

26 Feb 2025 17:36:25
 
            देशाला शाश्वत व हरित ऊर्जा साधनांनी सक्षम करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने समोर ठेवले असताना आता देशातील पहिले बॅटरीआधारित मालवाहू जहाज येत्या काळात तयार होणार आहे. तब्बल ३ हजार टन क्षमतेच्या या जहाजाची बांधणी लवकरच सुरू होणार आहे.
               देशाला हरित जहाज व हरित समुद्री क्षेत्राचा हब करण्यासंबंधी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय परिषद अलीकडेच केंद्रीय जहाज बांधणी व बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत मुंबईत झाली. त्यामध्ये बॅटरीआधारित देशातील या पहिल्या मालवाहू जहाजाची घोषणा मुंबई बंदरात समुद्री कार्यरत असलेल्या एसएसआर मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून करण्यात आली.
                'कुठलेही मालवाहू जहाज हे एरव्ही १०० टक्के डिझेलवर चालते. यामध्ये डिझेलद्वारे तयारी होणारी वीज बॅटरीत साठवली जाणार असल्याने डिझेल व इलेक्ट्रिक, अशी दोन्ही इंधन किंवा ऊर्जा साधने जहाज चालविण्यासाठी उपलब्ध असतील, यामुळे १० टक्के इंधनाची बचत होऊन तितके कार्बन उत्सर्जन कमी होईल.  
                  २०४७ च्या विकसित भारताच्या दृष्टीने हे समुद्री क्षेत्रातील पहिले मोठे पाऊल आहे,' असे 'एसएसआर मरिन'चे संजीव अग्रवाल यांनी या परिषदेत स्पष्ट केले.

महाराष्ट्र टाईम्स २५/२/२५
Powered By Sangraha 9.0