भोपाळ : जगभरात अनेक सामूहिक विश्वविक्रमही होत असतात. आता मध्य प्रदेशातील खजुराहोमध्ये १३९ कलाकारांनी सलग २४ तास नृत्य करण्याचा विश्वविक्रम केला आहे. खजुराहो नृत्य महोत्सवाच्या पहिल्या दिवशी हा नृत्याचा विश्वविक्रम करण्यात आला. येथे १३९ कलाकारांनी २४ तास ९ मिनिटे आणि २६ सेकंद सतत सादरीकरण केले. यावेळी कलाकारांनी कथ्थक, भरतनाट्यम, कुचीपुडी, मोहिनीअट्टम आणि ओडिसी नृत्य सादर केले. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्च्या अधिकृत टीमने मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांना शास्त्रीय नृत्य मॅरेथॉन रिलेचे प्रमाणपत्र सुपूर्द केले.
५१ वा खजुराहो नृत्य महोत्सव कंदरिया महादेव आणि देवी जगदंबा मंदिरांमध्ये आयोजित केला जात आहे. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३४ ते २० फेब्रुवारी रोजी दुपारी २.४३ पर्यंत ही डान्स मॅरेथॉन चालली. मुख्यमंत्री डॉ. यादव म्हणाले, कलाकारांच्या मेहनतीला मी सलाम करतो. ही नृत्याद्वारे भगवान श्रीकृष्णाची कथा सांगण्याची कला आहे. या प्रमाणपत्रामुळे नृत्यप्रेमींचा आत्मविश्वास आणि आदर वाढेल. यावर्षी पहिल्यांदाच खजुराहो बाल नृत्य महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि नवीन पिढीला नृत्यासाठी प्रेरित करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. त्याचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना प्राची शाह यांच्या हस्ते झाले. पहिल्या दिवशी कथकली, मोहिनीअट्टम आणि ओडिसी नृत्यांचे सादरीकरण झाले. मॅरेथॉनचे नृत्यदिग्दर्शन प्राची शाह यांनी केले होते, तर संगीत दिग्दर्शन कौशिक बसू यांनी केले.