मराठी भाषा दिनाच्या निमिताने

27 Feb 2025 10:35:31
 
मराठी बोलताना इंग्रजी शब्द वापरण्याचं प्रमाण वाढतच चाललंय. बोलण्यासाठी दुसऱ्या भाषेचा आधार घेणं आणि प्रत्येक वाक्यात इंग्रजी शब्दांची संख्या मराठी शब्दांपेक्षा जास्त असणं यामुळे मराठीतले अनेक शब्द आपण विसरत चाललो आहोत. कोणत्याही परकीय भाषेवर प्रभुत्व मिळवणं चुकीचं नसलं तरीही काही जणांना आपली मातृभाषा नीट येत नाही, याचं दु:ख न वाटता अभिमान वाटतो, हे कितपत योग्य आहे? येत्या ‘मराठी भाषा गौरव दिना’ (२७ फेब्रुवारी) निमित्तानं…

‘यामुळे काय होतं ना, असं मराठी आपण बोलायचो तसं आपल्या पुढची पिढी नाही बोलत, आणि त्याच्या पुढची पिढी तर आणखीनच इंग्रजाळलेलं मराठी बोलते, बरोबर आहे की नाही?’’ पाटील काकांनी प्रश्न केला. उत्तरादाखल दोन्ही श्रोत्यांनी फक्त मान हलवली.
‘‘आणि इंग्रजीचं मात्र उलट आहे, पुढच्या पिढ्या अधिकच जास्त चांगलं इंग्रजी बोलतात. ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे वगैरे सगळं मला मान्य आहे, इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यालाही माझा विरोध नाही. पण समाजात एक वर्ग असा आहे की, ज्यांना आपली मातृभाषा नीट येत नाही याचं दु:ख नाहीच, उलट अभिमानच आहे. ते मला खुपतं. मराठी बोलताना प्रत्येक वाक्यात इंग्रजी शब्दांची संख्या मराठी शब्दांपेक्षा जास्त असते. आणि मग या लोकांकडे पाहून ज्यांना इंग्रजी फारसं येत नाही त्यांना उगाच न्यूनगंड वाटू लागतो.’’
‘‘अहो, आजकाल ऑफिसमध्ये सगळीकडे इंग्रजीत बोलतात. दुसऱ्या राज्यातून आलेले लोक असतात ‘कलीग’ म्हणून, त्यामुळे एक सवय होऊन जाते, शेवडे काकांनी योग्य कारणं सांगितली. पण पाटील काका आधीच विचार करून बसल्यासारखे बोलले, ‘‘अहो, ते मला मान्यच आहे, कार्यालयात आणि सहकाऱ्यांबरोबर मी समजू शकतो की भाषांची सरमिसळ होणार, पण म्हणूनच घरी प्रयत्न केला पाहिजे ना! घरी आपल्या मुलांशी शक्य तितकं स्वच्छ मराठीत बोलण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे.’’ आपण बोललेल्या प्रत्येक इंग्रजी शब्दाला पाटील काका प्रमाण मराठी शब्द वापरून उत्तर देत आहेत हे एव्हाना शेवडे काका आणि साबळे काका यांच्या लक्षात आलं होतं. ‘‘आपण जे काही आहोत ते आपल्या मातृभाषेमुळं आहोत. तेवढं देणं लागतोच आपण,’’ पाटील काका उदासपणे स्वत:शीच बोलत होते.
‘‘तुम्ही फारच ‘इमोशनल’ झालात.’’ साबळे काका म्हणाले, ‘‘कालाय तस्मै नम: दुसरं काय? आपण आपल्या परीनं मराठी बोलत राहू, तेवढं आपल्या हातात आहे.
बाकी तुमची युक्ती मात्र चांगली आहे, कोणी इंग्रजी शब्द वापरले की आपण त्याला मराठी प्रतिशब्द वापरून उत्तर द्यायचं.’’ शेवडे काका पाटील काकांना टाळी देत म्हणाले.
पाटील काका हसून म्हणाले, ‘‘मी आजकाल सगळीकडेच असंच करतो, अगदी आमच्या कुटुंबाच्या व्हाट्सअॅप समूहावरसुद्धा!! ‘लिफ्ट’ला उद्वाहक म्हणा, किंवा ‘टीव्ही’ला दूरचित्रवाणीच म्हणा इतका अट्टहास धरत नाही मी, पण ‘प्लेन’ला विमान म्हणा, ‘बॉल’ला चेंडू म्हणा, ‘सिरीयलला मालिका म्हणा, एवढं सांगतो. तेवढाच आपला खारीचा वाटा. बघा किती छान शब्द आहे ‘वाटा’, यातच खरी मजा आहे ना! ’’

लोकसत्ता चतुरंग २२.२.२५ 

Powered By Sangraha 9.0