गडचिरोली - छत्तीसगड सीमेवरील पेनगुंडा व नेलगुंडा येथे पोलिस मदत केंद्र स्थापन केल्याने बिथरलेल्या नक्षल्यांनी कियेर (ता. भामरागड) येथील माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी (४५) यांची हत्या केली. रविवारी सकाळी गावालगत मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ नक्षल्यांनी एक पत्रक टाकले. त्यात मृत व्यक्तीने पेनगुंडा येथे पोलिस मदत केंद्र उघडण्यासाठी पोलिसांना मदत केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
अतिदुर्गम भागातील नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या परिसरात पोलिसांनी अवघ्या एका दिवसात पोलिस मदत केंद्र उभारण्याची किमया केली. डिसेंबर महिन्यात पेनगुंडा गावाजवळ पोलिस मदत केंद्र सुरू केले. त्यानंतर नेलगुंडा येथे ३० जानेवारीला पोलिस मदत केंद्र उघडण्यात आले. यामुळे छत्तीसगडमधून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नक्षलवाद्यांची नाकाबंदी झाली होती.
नाकाबंदीमुळे बिथरलेल्या नक्षल्यांनी उगवला सूड
तीन नक्षल्यांनी १ फेब्रुवारीला रात्री कियेर गावातून सुखराम मडावी यांना उचलले व मैदानावर नेऊन मारहाण केली. त्यानंतर त्यांना जंगलात नेले. तेथे त्यांची गळा दाबून हत्या केली.
लोकमत ३.२.२५