कोकणचे सौंदर्य पहा हाऊसबोटीतून – महिला बचतगट करणार संचालन

01 Mar 2025 14:36:27
 

रत्नागिरी जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत आहे. केरळच्या धर्तीवर स्कूबा डायव्हिंग, वॉटरबाईक असे अनेक वॉटर स्पोर्टस् आहेतच, आता त्यात हाऊसबोटीची भर पडली आहे. जिल्हा परिषदेने  केरळमध्ये आहेत, तशा हाऊसबोटी महाराष्ट्रातील पर्यटकांना अनुभवता याव्यात  यासाठी तब्बल पाच बोटी घेण्याचा निर्णय घेतला. पहिल्या बोटीचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला. विशेष म्हणजे या बोटी खासगी ठेकेदारांना न देता महिला बचतगटांना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील आणि देशातीलही हा  असा पहिलाच प्रकल्प असणार आहे.

रत्नागिरी जिल्हा सध्या पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. कोकणातील समुद्र जसे अथांग आहेत तसेच इथल्या नद्या व खाड्यांची पात्रही मोठी विस्तीर्ण आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सध्या विविध उपक्रम राबवले जात आहेत. केरळच्या धर्तीवर रत्नागिरीतही हाऊसबोट सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला. हा निर्णय घेतानाच त्यातून महिला बचतगटांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेने  ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २०२३-२४ पर्यटन वाढीसाठी उमेद’ अंतर्गत महिला बचतगटांसाठी  एकूण पाच हाऊसबोटी घेतल्या आहेत.

जयगडच्या खाडीत सध्या हा उपक्रम सुरू केला आहे. दोन मजली असणारी ही हाऊसबोट आकर्षक चित्राने रंगवण्यात आली आहे. डायनिंग प्लेस, बेडरूम, रूममध्ये टीव्ही अशा  अनेक आलिशान सोयी या बोटीवर आहेत. २४ तासांसाठी ही बोट असणार आहे. यामध्ये जेवण, चहा, नाश्ता सर्वकाही पॅकेजमध्ये असणार आहे. विशेष म्हणजे कोकणातील खाद्यपदार्थांच्या संस्कृतीचे दर्शन या बोटीमध्ये पाहायला मिळणार आहे.

               या हाऊसबोटीतून खाडीपट्ट्यातील निसर्गाचे सौंदर्य पर्यटकांना पाहायला मिळणार आहे. या हाऊस बोटीला पर्यटकांची मागणी वाढते आहे. विशेषतः प्री-वेडिंग शूटला सर्वाधिक या हाऊसबोटीला पसंती मिळत आहे. या हाऊस बोटीमुळे केरळचा  फिल आता रत्नागिरीत अनुभवता येणार आहे. ‘पाण्यावर तरंगणारं आलिशान हॉटेल’ असेच या बोटीकडे पाहून म्हणता येईल. हे महिला सक्षमीकरणाचे एक मोठे पाऊल आहे.

Powered By Sangraha 9.0