फळे, भाज्या काढणीच्या पारंपरिक, आधुनिक यंत्रणा - भाग ३

01 Mar 2025 16:35:59
 

आधुनिक तंत्रज्ञान काढणी

सध्या मजुरांची उपलब्धता कमी होत असून, बहुतांश शेतकऱ्यांना आधुनिक काढणी तंत्रज्ञानाकडे वळावे लागणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे काढणीची कार्यक्षमता वाढते. त्याचा प्रारंभिक खर्च अधिक असला तरी पुढील चलखर्च कमी होतो. फळांची गुणवत्ता चांगली मिळण्यास मदत होते. यात प्रामुख्याने स्वयंचलित रोबोटिक काढणी प्रणाली, ड्रोन तंत्रज्ञानाचा समावेश होतो.

स्वयंचलित रोबोटिक काढणी प्रणाली

याद्वारे काढणी प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित व मानवाच्या हस्तक्षेपाविना पार पाडली जाते. यामुळे मानवी कष्ट कमी होतात. फळांची काढणी योग्य काळातच करणे शक्य होते. परिणामी, अंतिम उत्पादनाची गुणवत्ता चांगली मिळते. परदेशामध्ये विविध फळांची काढणीसाठी स्वयंचलित रोबोट्सचा वापर केला जातो. या रोबोट्समध्ये सेन्सर्स फळांची परिपक्वता ओळखण्याचे काम करतात. त्यानुसार आर्मला फळ तोडण्याची सूचना देतात. आर्म ते फळ तोडते. उदा. सफरचंद, आंबा आणि संत्री इ.

* वापर : सध्या याचा वापर प्रामुख्याने परदेशात, मोठे क्षेत्र व प्रगतिशील अशा शेतकऱ्यांकडून केला जाऊ लागला आहे.

टक : सेन्सर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर, तोडणीसाठी आर्म किंवा विशिष्ट धारदार साधन.

* देखभाल : सॉफ्टवेअर अद्ययावत ठेवणे, व भागांची वेळोवेळी तपासणी करणे इ.

ड्रोन तंत्रज्ञान

सध्या अत्याधुनिक शेतीत उंच झाडांवरील फळे काढण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. ड्रोनच्या वापरामुळे वेळ, श्रम यात बचत होते. शेताचा व काढणीयोग्य पिकांचा नकाशा बनवून योग्य वेळी काढणी करणे शक्य होते. यात फळ पक्वतेच्या योग्य अवस्थेत असल्याचे खात्री ड्रोनवर लावलेल्या कॅमेरा व अन्य सेन्सर्सद्वारे केली जाते. त्यानंतर ड्रोनमध्ये कापणी यंत्रणा व जाळी बसवून फळे गोळा केली जातात.

* वापर : सध्या याचा वापर प्रामुख्याने परदेशात, मोठे क्षेत्र व प्रगतिशील अशा शेतकऱ्यांकडून उंचीवरील फळे काढणीसाठी केला जाऊ लागला आहे.

* घटक : फ्रेम, प्रोपेलर्स, मोटर्स, कॅमेरा किंवा अन्य सेन्सर्स, फळे तोडण्यासाठी लहान कटर, फळे गोळा करण्यासाठी जाळी, बॅटरी, रिमोट कंट्रोल/ऑपरेटिंग सिस्टम, त्याचे सेन्सर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर इ.

*देखभाल : सॉफ्टवेअर अद्ययावत ठेवणे.हलत्या भागांची वेळोवेळी तपासणी करणे. प्रोपेलर्स, कॅमेरा, आणि क्लिपिंग यंत्रणा नियमित साफ करणे. बॅटरीचे वेळोवेळी चार्जिंग किंवा गरजेप्रमाणे बदलणे, कटर ब्लेड्स व जाळीची स्थिती वेळोवेळी तपासणे.

रोबोट्स व ड्रोन आधारीत काढणी यंत्रणा अद्याप संशोधन आणि विकासाच्या पातळीवर आहेत. त्याच्या किमतीही जास्त आहेत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर आहेत. मात्र त्यांच्या उत्पादनामध्ये विविध कंपन्या, स्टार्टअप उतरले असून, भविष्यात किमती कमी होतील ही आशा वाटते.

काढणी उपकरणांची देखभाल

* प्रत्येक वापरानंतर साधन स्वच्छ करणे.

* गंज रोखण्यासाठी तेल लावणे.

* आवश्यक त्या हलत्या भागांना ग्रीसिंग करणे. खराब झालेले भाग वेळेत बदलणे.

* उपकरणे थंड व कोरड्या ठिकाणी ठेवणे.

* सॉफ्टवेअर अद्ययावत ठेवणे.

* बॅटरी चार्जिंग व देखभाल करणे.


अॅग्रोवन  १५.२.२५

Powered By Sangraha 9.0