संयुक्त राष्ट्रे - 'पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा भाग बेकायदा व्यापला असून, तो रिकामा करावा,' अशा शब्दांत भारताचे संयुक्त राष्ट्रांतील स्थायी प्रतिनिधी पार्वथनेनी हरीश यांनी सोमवारी पाकिस्तानला सुनावले. 'जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील,' याचा पुनरुच्चारही त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत केला.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत शांतता मोहिमेबाबतच्या चर्चेत पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा उल्लेख केल्यानंतर हरीश यांनी पाकिस्तानला लक्ष्य केले. 'पाकिस्तानच्या प्रतिनिधीने भारताच्या जम्मू-काश्मीर प्रांताबाबत पुन्हा अनावश्यक विधान केले आहे. असा उल्लेख वारंवार करून पाकिस्तानचा काश्मीरवरील दावा वैध ठरत नाही किंवा पाकपुरस्कृत दहशतवादाचे समर्थनही होऊ शकत नाही,' अशा शब्दांत हरीश यांनी फटकारले. 'आपले विभाजनवादी धोरण रेटण्यासाठी पाकिस्तानने या मंचाचे लक्ष विचलित करू नये,' असा सल्लाही त्यांनी दिला.
महाराष्ट्र टाईम्स २६.५.२५