भारतीय कालगणनेची पद्धत ‘भारतीय ज्ञानप्रणाली’ म्हणजेच Indian Knowledge Systemचे फलित आहे. ह्या नववर्षाला ‘हिंदू नववर्ष’ म्हटले जाते. ‘हिंदू’ म्हणजेच ‘भारतीय’. ‘हिंदू’ मध्ये जैन, बौद्ध, शीख आदि सर्व संप्रदायांचा समावेश होतो. त्यामुळे या वर्षी भारतीय ज्ञानपरंपरा जाणून घेण्याची गुढी प्रत्येकाने उभी करायचा संकल्प सोडावा.
चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे - शुक्ल प्रतिपदेला, अर्थात पाडव्याला आपले नवीन वर्ष सुरू होते. हा सण महाराष्ट्रात पाडवा, कर्नाटक आणि आंध्रात युगादी, सिंधमध्ये चेत्ती चांद आदी नावांनी साजरा होतो. उंच गुढी उभी करून, सजवून, इंद्रध्वज म्हणून, तिची पूजा केली जाते. नवीन वर्षात आपल्या राष्ट्राचे रक्षण करावे, वेळेवर पाऊस यावा अशी प्रार्थना इंद्रदेवाला केली जाते. ह्या परंपरेचा उल्लेख महाभारतात उपरीचर राजाच्या कथेत आला आहे. ह्या उत्सवाचे वर्णन ‘गाथा सप्तशती’ ह्या इसवी सनाच्या पहिल्या शतकातील महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील काव्यसंग्रहातही आले आहे.*
वर्षगणनेच्या मागे आकाशाचे निरीक्षण, नक्षत्रप्रणाली, ऋतूंचा अभ्यास, त्यांच्या नोंदी, गणित, भूमिती असे मोठे विज्ञान आहे. त्यामधून वर्षाचा कालावधी, त्यातील महिने, महिन्यांचा कालावधी, दिवसांची नावे ठरवली गेली. वर्षाची सुरुवात एका ठरावीक दिवसापासून केली गेली. आपण ती चैत्र पाडव्याला (आणि काही गणनेत दिवाळीतील पाडव्याला) करतो.
येत्या पाडव्याला शालिवाहन शके १९४७ अथवा युगाब्द ५१२६ सुरू होत आहे. वर्ष मोजण्याची युगाब्द गणनेची सुरुवात कलियुगाच्या आरंभापासून केली आहेे. ज्या दिवशी अनेक ग्रह एका ठरावीक ठिकाणी एकत्र आले होते, तिथपासून कलियुगाची सुरुवात मानली गेली. त्या आधीची वर्षे द्वापारयुगातील होती. त्याच्या आधीची वर्षे त्रेतायुगातील होती. त्याही आधीची वर्षे सत्ययुगातील होती. अशा पद्धतीने गणना केल्याने एखाद्या वर्षाला - कलियुगपूर्व ५वे वर्ष, कलियुगपूर्व ५३वे वर्ष असे म्हणावे लागत नाही! त्याला स्वत:चे नाव असते.
सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://www.evivek.com/Encyc/2025/3/25/Gudi-Padwa-is-celebrated-on-the-auspicious-occasion-of-the-Hindu-New-Year.html