खानदेशातून आखातासह अन्य भागात केळीची निर्यात गती घेत आहे. दर्जेदार केळी काढणीवर असून, रोज १४ ते १६ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात सध्या होत आहे.
निर्यातीच्या केळीचे दर मागील महिनाभरापासून स्थिर आहेत. परंतु दरात काहीशी घसरणही झाली आहे. मध्यंतरी निर्यातीच्या केळीचे दर २३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. सध्या २१०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर निर्यातीच्या केळीस मिळत आहे.
नंदुरबारातून रोज पाच कंटेनर, धुळ्यातून तीन आणि जळगाव जिल्ह्यातून चार ते सहा कंटेनर केळीची निर्यात परदेशात होत आहे. मागील हंगामात निर्यातीच्या केळीचे दर मार्चमध्ये १४०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल असे होते. परंतु यंदा दर बऱ्यापैकी आहेत. जळगाव जिल्ह्यातून चोपडा, यावल, रावेर व मुक्ताईनगरात निर्यातक्षम केळी अधिक आहे. धुळ्यातील शिरपूर आणि नंदुरबारात शहादा तालुक्यात निर्यातक्षम केळी अधिक आहे.बऱ्हाणपूर येथे आवक मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीमधील दरानुसार खानदेशात केळीचा दर निश्चित होतात. तेथे आवक मध्यंतरी कमी होती. यामुळे कमाल दर किंवा दर्जेदार केळीचे दर २००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते.
ॲग्रोवन २६.३.२५