कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने गेल्यावर्षी २८ फेब्रुवारी रोजी गोड्या पाण्यातील मोत्याच्या शेतीचा प्रयोग हाती घेतला. हा मोती पिकविण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून, एका वर्षात मोती निर्माण करण्यात संशोधकांना यशही आले. विद्यापीठात पिकलेला पहिला मोती राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते भेट देण्यात आला.
प्राणिशास्त्र अधिविभागाच्या परिसरात गोड्या पाण्यातील मोती संशोधन केंद्र उभारण्यात आले असून, गोड्या पाण्यातील मोत्यांविषयी संशोधन व विकासाचे काम सुरू आहे. या क्षेत्रातील यशस्वी प्रयोगशील उद्योजक दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य देखभाल आणि संवर्धनामुळे शिंपल्यांपासून चांगल्या प्रकारचे मोती साकार होऊ लागले आहेत. त्यातील साधारण १२ महिन्यांचा पहिला मोती तयार झाला.
कमी खर्चात जास्त नफा
पारंपरिक शेतीला पर्याय, तसेच जोडव्यवसाय म्हणून विद्यार्थी व शेतकरी मोत्यांची शेती करू शकतात, केवळ जागा अगर कृत्रिम वा नैसर्गिक तलाव आणि २५ ते ३० हजारांच्या गुंतवणुकीतून ३ ते ४ लाखांचे उत्पन्न मिळू शकते.
शिंपल्यातील मृत्युदर अवघा २० टक्के
मोती संशोधन केंद्राचे समन्वयक तथा प्राणीशास्त्रज्ञ डॉ. नितीन कांबळे म्हणाले, गतवर्षी आम्ही पाण्यात संवर्धनासाठी सोडलेल्या १०० शिंपल्यांमधील मृत्युदर अवघा २० टक्के आढळला.
लोकमत 2.3.24