'कवठा'ला मिळणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ

05 Mar 2025 14:35:36
 
                 महाशिवरात्रीला आवर्जून सेवन केले जात असलेल्या बहुगुणी कवठाचे लोणचे, आइस्क्रीम, पाणीपुरी, अर्क असे विविध २५ खाद्यपदार्थ नाशिक येथील 'मविप्र 'च्या  केटीएचएम  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारले आहेत. त्यामुळे शेताच्या बांधावर सहज आढळणाऱ्या आणि औषधी गुणधर्म असलेल्या कवठ या फळाला आता जागतिक बाजारपेठ मिळू शकणार आहे.  केटीएचएम' मधील वनस्पतिशास्त्र विभागातील विद्याथ्यांनी 'कपिध्याः' उपक्रम सुरू केला असून, त्या माध्यमातून प्रक्रिया करून कवठापासून  पदार्थ तयार करण्यात आले आहेत.  महाशिवरात्रीच्या दिवशी कवठ आहारात असावे असा प्रघात आहे.
                   या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी कवठाच्या व्यापारीकरणाला नवी दिशा देण्यासाठी प्रयत्न केला आहे. औषधी गुणधर्म, आयुर्वेदिक उपयोग आणि पौष्टिकता यामुळे कवठाचे महत्त्व मान्यताप्राप्त आहे. मात्र, याकडे अद्यापही व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले गेले नव्हते. पण, आता या विद्यार्थ्यांनी कवठाच्या उत्पादनावर संशोधन करून त्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार करण्यास सुरुवात करीत स्थानिक शेतकऱ्यांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्याचा संकल्प केला आहे.  या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभत आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला पेटंटच्या माध्यमातून संरक्षित करण्याचा मानसदेखील  संस्थेने व्यक्त  केला आहे. 
                 विद्यार्थ्यांनी कवठाचे लोणचे, कूट, पोळी, तिखट चटणी, आइस्क्रीम, खीर, जॅम, जेली, कैंडी, विरकोट, शिरा, वडी, कांजी, पाणीपुरी, गोड चटणी, वाइन, रबडी, भेळ, अर्क असे विविध २५ पदार्थ तयार केले आहेत.
Powered By Sangraha 9.0