'अहिल्या सेल' उपक्रम; पुण्यात प्रत्येक महिलेसाठी मोफत विधी सेवा

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची नवी योजना; पोलिस ठाण्यात महिला वकील नेमणार

Vartapatra    01-Apr-2025
Total Views |

sanskrutik vartapatra_ahilya-cell-pune-legal-aid-for-women.png
 
पुणेः प्रत्येक महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने 'अहिल्या सेल' मोहीम हाती घेतली असून, त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला वकिलांची नेमणूक केली जाणार आहे. पोलिस ठाण्यात दाद मागण्यासाठी आलेल्या प्रत्येक महिलेला 'अहिल्या सेल'च्या वकील मोफत विधी सेवा देणार असून, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणार आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासह पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील प्रत्येक पोलिस ठाण्यात येत्या १० फेब्रुवारीपासून 'अहिल्या सेल' कार्यान्वित होणार आहे.

विविध गुन्ह्यांतील पीडित महिला तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात जातात. मात्र, तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली जाते किंवा पोलिस ठाण्यात बसवून ठेवले जाते, अशा तक्रारी पीडितांकडून केल्या जातात. काही गंभीर गुन्ह्यांमध्ये पीडित महिलेच्या पाठीशी तिचे कुटुंबीयही उभे राहात नाहीत. अशा परिस्थितीत न्याय मिळण्यासाठी पीडित महिलेला स्वतःच संघर्ष करावा लागतो.
अनेक पीडित महिला त्यांचे हक्क, अधिकार, कायद्यातील तरतुदी यांबाबत अनभिज्ञ असतात, पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी पीडितांना मदत करतात; परंतु त्यांच्यावर अन्य कामांचाही ताण असतो. त्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक महिलेला कायदेविषयक मदत देण्यासाठी 'अहिल्या सेल' कार्यान्वित केला जाणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. सोनल पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र टाईम्स ३०.१.२५