
म्हसवड : दुष्काळी माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी गावच्या नकुसा आणि सदाशिव आटपाडकर या ऊसतोड मजूर दाम्पत्याची मुलगी काजल आटपाडकर. काजलची नुकतीच भारतीय हॉकी संघात निवड झाल्याने माण तालुक्यामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
सदाशिव आटपाडकर यांना वडिलोपार्जित फक्त अर्धा एकर जमीन आहे. मात्र, कायम दुष्काळी भाग असल्यामुळे पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करून पाण्याची तहान भागवावी लागते, तर शेतीला पाणी कुठून येणार? असा प्रश्न पडत असल्याने आपल्या पाच मुली व दोन मुलांचा सांभाळ कसा करायचा, हा यक्ष प्रश्न नकुसा व सदाशिव या दाम्पत्यासमोर होता. मुलांचे संगोपन व भविष्य घडवण्यासाठी त्यांनी ऊसतोड मजूर म्हणून अनेक वर्षे घराला टाळे ठोकून मुले इतरांकडे ठेवून परमुलखात ऊसतोड मजुरी केली.
काजल ही लहानपणापासून जिद्दी व चिवट होती. तिच्यातील गुण ओळखून चंद्रकांत जाधव व संगीता जाधव या दाम्पत्याने तिला पाटलाची वस्ती येथील मराठी शाळेत तिसरीपर्यंतचे शिक्षण देण्याची सोय केली. तिच्यातील खेळाचे प्रावीण्य ओळखून शिक्षकांनी तिला क्रीडा प्रबोधिनीच्या चाचणी स्पर्धेत उतरवले. तिची निवड झाल्याने तिला छत्रपती संभाजीनगर येथील बालेवाडी येथे प्रवेश मिळाला व तिथूनच तिच्या खेळाचा प्रवास सुरू झाला.
काजलने आपल्याकडे असलेली क्षमता ओळखत हॉकीचा सराव सुरू केला. या खेळामध्ये तालुका, जिल्हा, राज्यपातळीवर तिने चमकदार कामगिरी करून दाखवली. तसेच, तिला हॉकी स्पर्धेसाठी विविध ठिकाणी संधी मिळाली. तिने जर्मनीतही हॉकी या खेळात चमकदार कामगिरी केल्याने तिची नुकतीच भारतीय हॉकी संघात निवड झाली आहे.
थक्क करणारा प्रवास
दुष्काळी परिस्थितीमुळे माणदेशी जनतेला जीवनाचा खेळ नकोसा होत असताना नकुसा आणि सदाशिव आटपाडकर या ऊसतोड मजूर दाम्पत्याच्या पोटी जन्म घेऊन जन्मापासूनच दुःख, दारिद्र्य, कष्ट सोसत मोठं झालेल्या काजल आटपाडकरने भारतीय हॉकी संघात आपले स्थान निश्चित केले आहे. निवडीपर्यंतचा तिचा हा प्रवास अनेकांना थक्क करणारा आणि प्रेरणादायक आहे.
पुढारी ८.४.२५