वनराईचे पाईक - भाग १

23 Apr 2025 10:05:22

sanskrutik-vartapatra-anya_vanarai-vanprasth-foundation.jpg 
संत, महंतांनी आपल्या रचनेतून वनराई, वनसंपदेचे महत्त्व सांगितले आहे. आपले वनाशी खरं तर नातं आहे. पण हे ऐकण्यापुरते न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम केले ते सिन्नरस्थित 'वनप्रस्थ फाउंडेशन'च्या स्वयंसेवकांनी.

सिन्रर येथील ' वनप्रस्थ फाउंडेशन'चे कार्यकर्ते गेल्या सुमारे आठ वर्षांपासून घोटी रस्त्यावरील, सोनांबे शिवारातील, आई भवानी डोंगरावर नियमित दोन तासांच्या श्रमदानाच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि लागवड केलेल्या रोपांचे शंभर टक्के संवर्धन करीत आहेत. आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी ७५ पेक्षा अधिक प्रजातींच्या, सुमारे आठ हजारपेक्षा जास्त रोपांची लागवड करण्यात आली आहे. याठिकाणी पाण्याचा कोणताही कायमस्वरूपी स्रोत उपलब्ध नसताना 'वनप्रस्थ फाउंडेशन'च्या कार्यकर्त्यांनी गेल्या आठ वर्षांमध्ये रोपे जगवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.

प्रारंभीच्या काळात 'वनप्रस्थ फाउंडेशन'चे कार्यकर्ते रोपटे जगविण्यासाठी सिन्नर येथून मोटरसायकलवरून डबक्यांद्वारे पाणी आणत असत. दुर्दैवाने २०१७ मध्ये लावलेली ५०० हून अधिक झाडे अज्ञात व्यक्तीने वणवा पेटवल्याने पूर्ण जळून खाक झाली. परंतु स्वयंसेवकांनी या घटनेने खचून न जाता पुढीलवर्षी नव्या दमाने वृक्षारोपणाची कार्य निरंतर चालूच ठेवले, उन्हाळ्यात वृक्षरोपांना लागणारे पाणी सोनांबे गावातील सामाजिक कार्यकर्ते बाजीराव बोडके यांनी उपलब्ध करून दिले. परंतु नंतरच्या काळामध्ये रोपांची संख्या वाढत गेली. या ठिकाणी उपलब्ध पाण्याचे सर्वच स्रोत कमी पडू लागले. रोपांना जगविण्याची सर्व मदार ही टँकरवर होती. अशावेळी 'वनप्रस्थ फाउंडेशन'चे कार्यकर्ते सोपान बोडके यांनी 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर टँकरद्वारे पाण्याची उपलब्धता करून दिली. वेळप्रसंगी आपल्या शेतीचे पाणी देखील त्यांनी या रोपांसाठी उपलब्ध करून दिले. आपल्या विहिरीचे पाणी संपल्यानंतर, परिसरातून पाणी उपलब्ध करून त्यांनी ही रोपे जगवण्यासाठी प्रयत्न केले.
तरी देखील हा खर्च खूप मोठा होत होता. त्यामुळे आता या परिसरात पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत उपलब्ध होणे हे खूप गरजेचे होते. यासाठी आई भवानी डोंगरावर असलेल्या तळ्याचे पुनरुज्जीवन करण्याचे काम देखील स्वयंसेवकांनी हाती घेतले. परंतु अधिक पर्जन्यवृष्टी होत नसल्याने या ठिकाणचे पाणी वृक्षारोपणाकरिता कमी पडू लागले.
 
क्रमश:
सकाळ २३.३.२५
Powered By Sangraha 9.0